एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. प्रांतिक कायदेमंडळांना एक महत्त्वाचे काम करावयाचे होते. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र होणार्या भारताचा राज्यकारभार राज्यघटनेनुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार करावी आणि त्या घटना समितीने राज्य घटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे त्यांनी सुचविले होते. त्याप्रमाणे मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदेमंडळांनी घटना समितीचे प्रतिनिधी सभासद निवडण्याचे काम केले.
मुंबई कायदेमंडळात डा. आंबेडकरांच्या शेडयुल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे काग्रेस पक्षाच्या सहकार्याशिवाय ते मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना अस्पृश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्याची आवश्यकता वाटू लागली होती. तोपर्यंत मुंबई कायदेमंडळांच्या काग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून ब. मुकुंद जयकर आणि के. एम. मुन्शी या दोघांची निवडही केली. त्यामुळे मुंबई कायदेमंडळाकडून डॉ. आंबेडकरांना निवडून देण्याचा प्रश्नच राहिला नाही.
पण बंगाल प्रांताचे कायदेमंडळ डॉ. आंबेडकरांना सहकार्य करण्यास तयार झाले. ब. जोगेन्द्रनाथ मंडल आणि बंगाल प्रांताच्या कायदेमंडळाच्या मुस्लिम लीगच्या सभासदांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यास यशस्वी झाले. ते प्रथम पसंतीची ७ मते मिळवून काग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव करून विजयी झाले. अखेर डॉ. बाबासाहेब आबेडकर अस्पॄश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्यात यशस्वी झालेच.
२० अगस्ट १९४७ रोजी घटना समितीच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधीच्या सर्व कायदेशीर गोष्टी यांचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आल्याचे जाहीर केले आणि त्या समितीच्या सभासदांची नावेही जाहीर केली - डॉ. बी. आर. आंबेडकर, जी. व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार इत्यादी.
२९ अगस्ट १९४७ रोजी घटना समितीने एक ठराव पास करून स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्यासह सात सभासदाची ’मसुदा समिती’ नियुक्ती केली आणि विधिमंत्री डॉ. बी. आर. आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.
No comments:
Post a Comment